गुन्हेगारी

इगतपुरी-कसारा दरम्यान पुष्पक एक्स्प्रेसमध्ये विवाहितेवर बलात्कार; चार दरोडेखोर ताब्यात

इगतपुरी ः इगतपुरी ते कसारा दरम्यान पुष्पक एक्स्प्रेसमध्ये सात ते आठ दरोडेखोरांनी १६ प्रवाशांना लुटण्यासह एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी (दि.८) रात्री ८ च्या सुमारास घडली. दरोड्या नंतर यातील काही आरोपी कसारा रेल्वे स्थानकावर उतरून पसार झाले. तर दोन आरोपींना प्रवाशांनी मोठ्या धाडसाने पकडले. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत चार जणांना अटक केली असून उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे. यातील सात आरोपी इगतपुरी घोटी परिसरात राहतात तर एक आरोपी मुंबई येथे राहणारा आहे.

शुक्रवार संध्याकाळी सहाच्या सुमारास लखनऊ मुंबई पुष्पक एक्स्प्रेस इगतपुरी स्टेशनला पोहोचली. इगतपुरी स्थानकातून एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने निघाली असतांना आठ दरोडेखोर या एक्स्प्रेसमध्ये चढले. एक्स्प्रेसने इगतपुरी स्थानक सोडताच या आठ जणांनी प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. महिलांची छेड काढण्यास सुरुवात करीत अनेक महिलांचा विनयभंग केला. हे सर्व दरोडेखोर प्रवाशांकडून मोबाईल आणि पैसे हिसकावून घेत होते. प्रतिकार करणाऱ्या प्रवाशांना त्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली. गाडीतील १६ प्रवाशांना या दरोडेखोरांनी लुटत त्यांच्याकडून मोबाईल व रोकड हिसकावून घेतली. तर पतीसोबत प्रवास करणाऱ्या २० वर्षीय महिलेची छेड काढत तिच्यावर बलात्कार केला. कसारा घाटात दरोडेखोरांचा हा थरार सुरू होता. कसारा रेल्वे स्थानक येताच या दरोडेखोरांनी उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. या मधील सहा आरोपी निसटले मात्र याच दरम्यान काही धाडसी प्रवाशांनी दोन दरोडेखोरांना पकडून ठेवले. ट्रेन कसारा स्थानकात येताच पोलिसांनी या दरोडेखोरांना आपल्या ताब्यात घेतले. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपीना अटक करण्यात आली आहे. प्रकाश पारधी व अर्षद शेख या दोन आरोपींची नाव आहेत. नशेत त्यांनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कल्याण लोहमार्ग पोलीसांची पथके फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे