राजकीय

पंतप्रधान मोदींची संपत्तीत २२ लाखांची वाढ

नवी दिल्ली ः जवळपास साडेसात वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या पंतप्रधानपदी आहेत. त्यांच्या संपत्तीचा आकडा त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामधून जाहीर झाला आहे. अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान असताना केंद्र सरकारने केंद्रातील सर्व मंत्र्यांनी आपली वैयक्तिक संपत्ती दरवर्षी जाहीर करावी, असा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय कामकाजामध्ये पारदर्शकता यावी, यासाठी घेतला गेला होता. त्यानुसार दरवर्षी ३१ मार्च रोजी मंत्र्यांची संपत्ती जाहीर करणारे प्रतिज्ञापत्र सर्व केंद्रीय मंत्री सादर करत असतात. यामध्ये पंतप्रधानांच्या प्रतिज्ञापत्राचा देखील समावेश आहे.

३१ मार्च २०२१ च्या आकडेवारीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे ३ कोटी ७ लाखांची संपत्ती आहे. शेअर मार्केटमध्ये पंतप्रधानांच्या नावे कोणतेही शेअर्स नाहीत. पण नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (८.९ लाख), विमा पॉलिसी (१.५ लाख) आणि २०१२मध्ये २० हजार रुपयांना खरेदी केलेले एल अँड टी इन्फ्रास्ट्रक्चर बाँड त्यांच्या नावे आहेत. यासोबतच गांधीनगरच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ब्रँचमध्ये त्यांच्या नावे १ कोटी ८६ लाख रुपयांची एफडी आहे.
पंतप्रधानांच्या नावे कोणतीही गाडी नाही. त्यांच्याकडे ४ सोन्याच्या अंगठ्या आहेत. ज्यांची किंमत तेव्हाच्या बाजारभावानुसार १ लाख ४८ हजार एवढी आहे. ३१ मार्च २०२१ रोजीच्या आकड्यांनुसार त्यांच्या बँकेत १ लाख ५० हजार सेव्हिंग आणि ३६ हजाराची रोख रक्कम त्यांच्याकडे आहे.

पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकही नवी मालमत्ता खरेदी केलेली नाही. त्यांनी २००२मध्ये एक घर खरेदी केले होते. या घराची किंमत १ कोटी १० लाखांच्या आसपास आहे. पण त्यात देखील पंतप्रधानांची संयुक्त मालकी असून २५ टक्के भाग त्यांच्या मालकीचा आहे. या मालमत्तेचे एकूण क्षेत्रफळ १४ हजार १२५ चौरस फूट असून त्यातील ३ हजार ५३१ चौरस फुटांवर पंतप्रधानांची मालकी आहे. पंतप्रधानांची वैयक्तिक संपत्ती ही गेल्या वर्षी ३१ मार्चच्या आकडेवारीनुसार २ कोटी ८५ लाख एवढी होती. त्यामध्ये या वर्षी २२ लाखांची भर पडली असून ती ३ कोटी ७ लाखांच्या घरात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे