कृषीवार्ता

किलोला एक रुपया भाव मिळल्याने येवल्यात टोमॅटो रस्त्यावर फेकले

येवला | काबाडकष्ट करून, लाखो रुपये खर्च करून टोमॅटोचे भरघोस पीक घेतले. मात्र, बाजार समितीत चांगल्या प्रतीच्या टोमॅटोला अवघा रुपया दर मिळाल्याने संतप्त अंदरसूल येथील शेतकरी आदित्य जाधव याने सर्व टोमॅटो बाजार समितीसमोरील मनमाड- कोपरगाव रस्त्यावर ओतून निषेध व्यक्त केला.

शेतकरी आदित्य याने एक एकर क्षेत्रात टोमॅटो लावले. मंगळवारी तो टोमॅटो विक्रीसाठी बाजार समिती आवारात आला होता. मात्र, त्याच्या चांगल्या दर्जाच्या टोमॅटोला अवघे २५ रुपये क्रेट भाव पुकारण्यात आला. यातून टोमॅटोच्या लागवडीपासून ते तोडणीसाठी लागणारी मजुरीही वसूल होत नसल्याने संतप्त होऊन त्याने रस्त्यावर टोमॅटो फेकून दिले. सुरुवातीला चांगला दर मिळत होता. मात्र आता दर गडगडल्याने शेतकर्‍यांचा वाहतूक खर्चही निघत नाही. शेतकर्‍याने तीस कॅरेट टोमॅटो बाजार समितीत आणले होते. ते तोडणीला त्याला वीस रुपये खर्च, तसेच वाहतूक खर्च १५ रुपये आला होता. टोमॅटोच्या रोपाची खरेदी, लागवड, फवारणी, बांधणी, मालतोडणी, वाहतूक या सर्वांचा विचार केला तर सध्या मिळणारा भाव शेतकर्‍यांना कर्जबाजारी करणारा ठरेल. उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. टोमॅटोची मोठी आवक होत असल्याने उत्पादनाच्या तुलनेत देशांतर्गत मागणी होत नाही. गेल्या तीन वर्षांपासून पाकिस्तान सीमा बंद असल्याने त्याचा थेट परिणाम टोमॅटोच्या दरात होताना दिसते आहे. येवला बाजार समितीत टोमॅटोच्या २० किलोंच्या क्रेट्सला २५ ते ३० रुपयांपर्यंत म्हणजे एक रुपया किलो भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त होत आहेत.
……………..

टोमॅटो फेकून का द्यावे लागत आहेत? मिरची, ढोबळी, कारले, दोडके वगैरे काढण्याची मजुरी व गाडीभाडे खिशातून का द्यावे लागते आहे? एवढ्या भयानक काळात वीजबिल वसुलीसाठी सक्ती करून कृषिपंपाची वीज का तोडण्यात आली? न वापरलेल्या घरगुती वीजबिलाचे वाढीव बिल का येत आहे? ९०० रुपये गॅस सिलिंडरला का मोजावे लागत आहेत? असे प्रश्‍न व्यवस्थेला विचारायला सुरुवात करा.
– भागवतराव सोनवणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे