कृषीवार्ता

जिल्हा बँकेची समोपचार कर्जफेड योजना; व्याजात ५० टक्कापर्यंत सवलत

पिंपळगाव बसवंत : गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, तसेच कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीमुळे नाशिक जिल्हा बँकेच्या कर्जाची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेचे कर्जवाटप बंद आहे. जे शेतकरी सभासद कर्ज रक्कम नियमित भरतात, त्यांना जिल्हा बँकेने त्वरित कर्जपुरवठा करावा, असे आवाहन आमदार दिलीप बनकर यांनी केले.

येथील बाजार समिती सभागृहात आयोजित जिल्हा बँक, सहायक निबंधक कार्यालय, विविध कार्यकरी सोसायटीचे प्रतिनिधी यांच्या समन्वय बैठकीप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा बँकेचे प्रशासक मुहम्मद आरिफ यांनी सांगितले की, प्राथमिक शेती संस्था स्तरावरील व थेट कर्जाच्या थकबाकीदार सभासदांकडील थकबाकी वसुलीसाठी जिल्हा बँकेने समोपचार कर्जफेड योजना (OTS) कार्यान्वित केली आहे. यात जे सभासद २०१६ पर्यंत थकबाकीदार आहेत, त्यांना व्याजात ५० टक्के सवलत दिली जाईल. जे सभासद २०१७ पर्यंत थकबाकीत आहेत त्यांना व्याजात ४० टक्के सवलत दिली जाणार आहे. जिल्हा बँकेचा नफा वाढविण्यासाठी बँकेने ११.८८ टक्के व्याजदराने सोनेतारण कर्जवाटप सुरू केले आहे. याप्रसंगी जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक शैलेश पिंगळे, शेतकरी संस्थांचे प्रतिनिधी सोमनाथ मोरे, सुरेश खोडे, नंदकुमार सांगळे, जगनाथ कुटे व माणिकराव सरोदे यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी जिल्हा बँक कार्यकारी संचालक शैलेश पिंगळे, निफाडचे सहाय्यक निबंधक रणजित पाटील, पिंपळगावचे तलाठी राकेश बच्छाव, अभिराज पाटील, बाजार समितीचे उपसभापती दीपक बोरस्ते, संचालक निवृत्ती धनवटे, बाळासाहेब बनकर, सुरेश खोडे, बाबासाहेब शिंदे, माधवराव ढोमसे, साहेबराव खालकर, विजय देशमाने, अजय गवळी, राजेंद्र बोरगुडे, भूषण शिंदे, जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी ज्ञानेश्वर वाटपडे, केशवराव मोरे, चंद्रकांत बनकर, भानुदास विधाते, दत्तात्रय आथरे, सुरेश निरगुडे, राजाराम आथरे, परशराम आथरे, प्रवीण कागदे व चंद्रकांत खोडे उपस्थित होते.

जिल्हा बँकेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील सुमारे १७८ शाखांमध्ये सात-बारा उतारा केंद्राची उभारणी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांची डिजिटल उतारा काढण्यासाठी होणारी परवड कमी होईल.

-मुहम्मद आरिफ

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे