ब्रेकिंग

महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांत निर्बंध शिथिल करण्याचा प्रस्ताव

मुंबई : राज्यातील उद्योजकता वाढविण्यावर भर देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले असून त्यालाच अनुलक्षून सक्रिय करोना रुग्ण दर एकपेक्षा कमी असलेल्या १४ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला आहे.

दोन दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ज्या जिल्ह्यांमध्ये करोना सक्रिय रुग्णदर एक किंवा त्यापेक्षा कमी असेल तेथील करोना विषयक निर्बंध कमी करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर केला जाईल असे सांगितले होते. त्यानुसार आरोग्य विभागाने निर्बंध शिथिलीकरणाचा प्रस्ताव सादर केला आहे.

राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी ज्या १४ जिल्ह्यांमध्ये तीन आठवड्यांपेक्षा जास्त सक्रिय रुग्णदर एक वा त्यापेक्षा कमी आहे अशा जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आली आहे. याठिकाणी उद्योग- व्यापाराला पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी निर्बंध शिथील केले जाणार आहेत. एकीकडे पूरग्रस्त कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या वाढण्याची भीती आरोग्य विभागाला वाटत असून अशा जिल्ह्यांतील करोना आटोक्यात ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कशाप्रकारे करता येतील याचा आढावा आरोग्य विभाग घेत आहे.

राज्यात चार कोटीहून अधिक लोकांचे लसीकरण झाले असून एक कोटीहून अधिक लोकांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. राज्य करोना कृती दलाचे डॉक्टर तसेच तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार किमान ७० टक्के लोकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. मुंबईत ७० टक्के लोकांचे लसीकरण झाल्याशिवाय लोकल ट्रेनचा प्रवास सर्वांसाठी खुला करण्यास मुख्यमंत्री अनुकूल नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. जूनमध्ये राज्याला केंद्राकडून १.१५ करोना लसीच्या मात्रा मिळाल्या होत्या तर ऑगस्ट महिन्यासाठी केंद्र सरकारने १.२ कोटी लस मात्रा देण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात सध्या ४००० हून अधिक केंद्रांमधून लस दिली जात असून दिवसाला १२ लाख लोकांचे लसीकरण करण्याची आपली क्षमता असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्याला लसीच्या पुरेशा मात्रा मिळाल्यास नियोजित वेळेपेक्षा कमी वेळात आम्ही लसीकरण पूर्ण करू शकतो असे राजेश टोपे म्हणाले. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी केंद्रीय आरोग्य सचिवांना जुलैच्या मध्यावधीत पत्र पाठवून दीड कोटी अतिरिक्त लसीच्या मात्रा देण्याची विनंती केली होती. मात्र केंद्राने ऑगस्ट महिन्यासाठी १ कोटी २० हजार लस मात्र देण्यात येतील असे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर तिसर्या लाटेचा विचार करून १४ जिल्ह्यांसाठी करोना विषयक निर्बंध शिथिल करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
  • abc
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे