वृत्त-विशेष

नाशिक जिल्ह्यातील लॉकडाऊन सोमवारपासून शिथिल; पालकमंत्री भुजबळ यांची घोषणा

नाशिक, दि. २१ : जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कोरोनाबाधिंताची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेटही कमी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात मागील दहा दिवसांपासून लागू केलेला कडक लॉकडाऊन रविवारी (दि.२३)  मध्यरात्री १२ वाजेनंतर शिथिल करण्यात येणार आहे. मात्र, राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत १ जूनपर्यंत लागू केलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र व बाजार समित्या कोरोना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या आधीन राहून सुरु करण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (दि.२१) मुंबई येथून व्हिसीद्वारे कोरोनाबाबत जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेतला. भुजबळ म्हणाले, जिल्ह्यातील कडक लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम आठ दिवसात दिसून आला आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे राज्याचे ब्रेक द चेन अंतर्गत असलेले निर्बंध जसेच्या तसे लागू करुन जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्र व बाजार समित्या कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या आधीन राहून सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी.
उद्योग सुरु करतांना कारखान्यात येणाऱ्या प्रत्येक कामगार व त्यांच्या कुंटुबियांची जबाबदारी घेत असल्याचे कंपनीचे हमीपत्र घ्यावे. तसेच कारखान्यांमध्ये कोरोनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन कामकाज सुरु करण्यात यावे. जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा सुरु होत्या. यापुढे जीवनावश्यक सेवा राज्य शासनाच्या निर्बंधानुसार सुरु राहतील. जिल्ह्यातील लॉकडाऊन काळात बाजार समित्या पूर्णत: बंद ठेवण्यात आल्या होत्या. पंरतू अनेक शेतकऱ्यांचा माल पडून खराब होत असल्याने ‘ब्रेक द चेन’ च्या अनुषंगाने असलेल्या अटी शर्तीच्या आधीन राहून २३ मे नंतर बाजार समित्या देखील सुरु करण्यात येणार आहे. तसेच बाजार समिती प्रमुखांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन होणार नाही, असे हमीपत्र घेण्यात यावे, असे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता सध्या सुरु असलेल्या कोविड सेंटरच्या सुविधा कायम ठेवण्यात याव्या. तसेच तिसऱ्या लाटेत लहान बालकांना धोका अधिक असल्याचे सांगितले जात आहे. त्यानुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालय व महानगरपालिकेने गठीत केलेली टास्क फोर्सच्या सदस्याद्वारे बालकांच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांची माहिती एकत्रित करुन त्यानुसार नियोजन करावे. शहरासह ग्रामीण भागातही बालकांसाठी स्वतंत्र कोविड केअर सेंटर सुरु करावेत, अशा सूचना भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
आॅपरेशन थिएटरच्या कामाला गती द्या
कोरोनानंतर उद्भणाऱ्या म्युकरमायकोसिसच्या आजारावरील उपचारसाठी आवश्यक ऑपरेशन थिएटर्सच्या कामांना गती देण्यात यावी. तसेच जिल्ह्यात निर्माण करण्यात येणारे ऑक्सिजन जनरेशन प्लांटेचेही काम लवकरात लवकर पूर्ण करावे. आरोग्य विभागाने आवश्यक असलेले डॉक्टर्स, परिचारीका व इतर पदांची भरती करुन मनुष्यबळ उपलब्ध करुन घ्यावेत.  कोरोनाचा आलेख कमी करण्यात पोलीस विभागाने चांगली कामगिरी बजावली असून यापुढेही गर्दी होणार नाही व निर्बंधांचे कडक पालन होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना भुजबळ यांनी दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे