आरोग्य व शिक्षण

दहावी आणि बारावी ऑफलाईन परीक्षेसंदर्भात मोहीम राबविणार

मुंबई, दि. 11 : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरक्षित वातावरणात घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन राज्यभर समान स्तरावर ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी सज्ज होताना (‘वी कॅन डू ईट ऑफलाईन एक्झाम’) ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासंदर्भातील मोहीम राज्यभर राबविण्यात येणार असल्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
श्रीमती गायकवाड म्हणाल्या, विद्यार्थ्यांची सुरक्षा, शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये आणि परिक्षेच्या पूर्वतयारीस वेळ मिळावा या सर्व बाबींचा विचार करून परिक्षेचे वेळापत्रक ठरविण्यात आले आहे. वेळापत्रकाबाबत आणखी काही सुचना असतील तर त्या सादर कराव्यात. त्याबाबत सल्लागार समितीशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. प्रॅक्टीकल परीक्षा, जनरल सादर करणे याबाबत संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एकसारखा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
सह्याद्री वाहिनीवर शासनामार्फत व्याख्यानमाला सुरू असून, परिक्षेच्या पूर्वतयारीसाठी महत्त्वाचे प्रश्न, स्वाध्याय यासाठीही कार्यक्रम घेतले जातील असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना सामान्यत: पडणार्‍या प्रश्नांबाबत वेबसाईटवर लवकरच ‘एफएक्यु’ देण्यात येणार आहेत. ज्या निवासी शाळा बंद आहेत, त्या शाळेतील फक्त दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची आणि परीक्षा देण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असेही मंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे